समाधान

विद्यापिठाच्या रस्त्याने कडेने जात होतो. मी माझ्या माझ्याच धुंदीत होतो. थोडासा नाराज, थोड्याशा विचारातच होतो. रस्त्याच्या कडेने कसलेसे खोदकाम चालू होते. नालीचे तर नव्हते, कदाचित मोठ्या पाइप लाइन अथवा केबल चे असावे. दुपारची वेळ झालेली होती अन कामगार, कामगार कशाचे एकच जोडपे होते ते ! कदाचित त्यांनी एकट्यानेच काम घेतले असावे , भाकरी सोडून बसले होते . दोघेही रंगाने काळे कुट्ट ! आणि कृश ! काम करून थकलेले आणि भाकरी सोडून जेवत बसलेले असे ते प्रथम दर्शनी वाटत होते; पण घास घेता घेता ते दोघे कसलेसे बोलत होते, एकमेकांच्या नजरेत पाहत होते (जणू आपल्या संसाराचे हितगुजच करीत होते म्हणा ना ! ) काय बोलत होते काही ऐकू आले नाही परंतु ते दोघे एवढ्या कष्टानंतरही अगदी आरामात (रील्याक्स ) वाटत होते, जणू तू माझ्या सोबत आहेस मी तुझ्या सोबत आहे एवढेही काय कमी आहे काय ? अशा टाईप मध्ये ! मला जे काही त्यांच्या मध्ये दिसले ते असे कि त्यांना त्यांच्या काळ्या असल्याचा कमीपणा नव्हता , कामाचा ताण नव्हता , थकल्याच आभास नव्हता की आसपास एवढे मोठे विद्यापीठ आहे , एवढा मोठा परिसर आहे , एवढ्या गाड्या जात आहेत , एवढे लोक जात आहेत याचे आकर्षण नव्हते आणि गंधही नव्हता ! ते त्यांच्याच विश्वात मश्गुल होते … ते भाकरी खात होते … आपल्या जोडीदारासोबत … अगदी समाधानाने !

त्यांच्याकडे पाहून मनामध्ये एक आल्हाददायक आणि अगदी हलकासा तरंग उमटला आणि वाटले जगात फक्त काही सुखे , मिळकती, बक्षिसे जरी नाही मिळाली तरी आपला जोडीदार सोबत असणे आणि त्याच्यासोबत वेळ घालायला भेटणे हेही काही कमी समाधानाचे काम नाही !

Comments