'अनंतरंग' हे एक पुस्तक आणि ब्लॉग या संकल्पनेच्या पार्श्वभूमीविषयी माहिती सांगणारी ब्लॉग पोस्ट.
जवळपास ८ वर्षांपासून हि संकल्पना मनामध्ये घोळतेय! ... कि काय नेमके? सुरुवातीला 'अभिव्यक्ती' हे नाव दिले, नंतर 'अभिव्यक्त स्पंदने' असे सुचले. त्यानुसार सब टायटल हि लिहिले आणि दिले पण दोन्ही शीर्षके तेवढी टिकली नाहीत; कारण मनामधील काहूर च तेवढा दाटला होता आणि उमटायचा डोक्यामध्ये वेळोवेळी आणि कधी कधी. आठ वर्षांपूर्वी माझ्या स्वतःच्या बाबतीतल्या घडामोडीच तशा होत्या कि प्रचंड घुसमट, ताण-तणाव, घरची तसेच करिअर ची ओढ, मित्रांसोबत वेळ घालवायची आस, चांगले-वाईट, चित्र-विचित्र अनुभुती, बऱ्याच कालावधी साठी नशिबाला आलेला एकटेपणा, आणि या साऱ्या परिस्थिती मध्ये काही अंशी लाभलेली 'अवलाई' सोबत 'मनाची', 'मनाच्या अवखळ स्वभावाची' आणि 'मित्रांची' सुद्धा - या सर्व गोष्टींसोबत मार्ग काढीत असताना एकांतात मन कळत आणि नकळत पणे कधी खूप तर कधी साधारणपणे विचार करायचे आणि या साऱ्या गोष्टींचे 'आपण काय करायचे?' - 'आपण काय करायचे?' असा विचार करायचे आणि त्यातूनच या साऱ्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत, व्यक्त झाल्या पाहिजेत असे कुठेतरी मनाला वाटायला लागले आणि त्यातूनच या ब्लॉग चा जन्म झाला. पुस्तक वगैरे लिहिण्याची तयारी त्यावेळेस नव्हती कारण तेवढी खंबीरता त्यावेळी नव्हती आणि आताही आहे किंवा नाही ते माहित नाही पण बघू नंतर.
तर विषय असा होता कि या साऱ्या गोष्टी मला कुठेतरी व्यक्त करायच्या होत्या कारण त्याशिवाय मनात साचलेली गरळ बाहेर पडणार नव्हती आणि लहानपासूनच बऱ्याच वेळा केलेली निरीक्षणे देखील मला शेअर करायची होती तोही भाग होता आणि ब्लॉग सारखे माध्यम दुसरे तरी एवढे लेटेस्ट नाही त्यामुळे हा ब्लॉग निवडला.
त्यानंतर सुरु झाले (म्हणजे अर्थातच माझी संपूर्ण दैनंदिन कामे, रोजगार इत्यादी गोष्टी करूनच नकळत पाने राहिलेल्या वेळेतच किंवा माझी सर्व करीत असताना नकळतपणेच) ते शीर्षकाची तयारी! मनामधून 'तरंग' उमटत आहेत हे नक्की होते! आणि ते 'अनंत' आहेत हेही मी हेरले होते.
याचसंदर्भामध्ये शीर्षक देत असताना 'अंतरंग' हेच अतिशय समर्पक असलेले शीर्षक माझ्यासमोर होते परंतु अंतरंगाचा काही ठाव नाही, ते अनंत आहे; त्यामुळे 'अनंत असे अंतरंग' अश्या आशयाचे शीर्षक देण्याचे मी ठरवले; परंतु नाव देत असताना मात्र 'अनंतरंग' हेच नाव मी फायनल आणि सुनिश्चित केले; कारण त्यामध्ये 'अनंत + अंतरंग', 'अनंत + तरंग' आणि 'अनंत + रंग'
अशा तीन संगती एकाच वेळेस होत आहेत, शिवाय अशा संगती एकत्र होत असल्यामुळे ते मला खूपच आवडले म्हणजे त्यामध्ये मला अंतरंग, अनेक तरंग आणि अनेक रंग या तिन्हीही गोष्टी एकाच वेळेस वापरता येणार असतील.
(व्याकरणाच्या दृष्टीकोनातून, या तिन्हीही शब्दांची संधी नाही; परंतू तरीही ) अनंत आणि अंतरंग आणि रंग हे तिन्ही शब्द ज्याने धारण केलेले आहेत असा शब्द म्हणजेच 'अनंतरंग' हे शीर्षक या ब्लॉग आणि पुढील ईबुक / पुस्तक साठी सुनिश्चित झाले!
आपल्या जीवनात घटना घडतात, कधी कधी फार छोट्याश्या बदलला कारणीभूत ठरतात तर कधीकधी एक मोठे साम्राज्य निर्माण करतात आणि कधी कधी संपूर्ण जीवनशैलीच नष्ट करून जातात. अनुभव येतात, आपल्याला खूप काही शिकवून जातात. क्षण उद्भवतात, कधी स्मितहास्य देतात कधी मोठ्याने हसवतात तर कधी त्यांच्यामुळे रडावेहि लागते. ते कधी आपल्याला एक आल्हाददायक अनुभव देतात तर कधी आयुष्यभर आपल्या आठवणीत राहतात. भावना उचमळतात, बुद्धीवर ताबा घेतात आणि कधी आपल्या मनाला आणि आपल्याला भटकायला लावतात. विचार निर्माण होतात, कधी ते दुसर्यांना विचार करायला लावतात तर कधी एखाद्याची जीवनशैलीच बदलवून टाकतात तशीच बिघडवूनही टाकतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे या सर्व गोष्टी उद्भवतात (निर्माण होतात) आणि नष्ट पावतात, शिल्लक मागे काय राहते तर ती म्हणजे 'अभिव्यक्ती' (व्यक्त केलेली गोष्ट). हि अभिव्यक्ती खूप अनमोल आहे कारण तिच्यामध्ये या सर्व घटनांचा, अनुभवांचा, क्षणांचा, भावनांचा आणि विचारांचा एकंदरीत सार दडलेला असतो. या सर्व घडलेल्या गोष्टींचा तिने मुखवटा परिधान केलेला असतो. प्रत्यक्षामध्ये 'अभिव्यक्ती' हि वरील सर्व गोष्टींची देवाणघेवाण आहे. जी कि संपर्कामधल्या लोकांशीच केली जाऊ शकते. महत्वाची बाब हि आहे कि त्यामधली काहीच अस्तित्वात राहते. माझी स्वतःची हीच अभिव्यक्ती या लेखनाच्या माध्यमातून जगासाठी, आत्तासाठी आणि भविष्यासाठी शिल्लक राहावी म्हणून या माध्यमातून व्यक्त करत आहे.
अगदी त्याच पद्धतीने या शीर्षकाच्या माध्यमातून मी मला जे काही सांगावेसे वाटते / वाटेल किंवा व्यक्त करावेसे वाटते / वाटेल, जे काही मला दिसले, जे काही मी पहिले / माझ्या निरीक्षणाला आले किंवा जे काही मला (इतरांशी शेअर करण्यासाठी) महत्वाचे वाटले ते-ते शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हि शेअरिंग नेमकी कशी असेल हे मलाच माहित नाही कारण दिवसागणिक मी स्वतःच (दैनंदिन घडामोडींनुसार आणि मिळालेल्या / घेतलेल्या /ज्ञान अनुभवांनुसार) बदलत असतो आणि काल आपण कसे होतो याबद्दल मलाच कधी कधी खंत वाटते, कधी लाज वाटते तर माझ्याच काही बालिश गोष्टींवर कधी हसूदेखील येतं. असो! पण शेअर करून एकदाचं मन मोकळं हि होईल आणि इतरांसोबत संवाद हि होईल; कारण मनातल्या प्रत्येक गोष्टी ओळखीच्या लोकांना सांगता येतीलच असे नाही तर त्या अनोळखी लोकांसाठीच 'राखीव' असतील कदाचित!
या ब्लॉग वर मला स्वतःलाच - जीवनातील विविध पैलू, विविध क्षण, विविध अवस्था, विविध अनुभव, विविध स्थिती, परिस्थिती, व्यक्तिमत्व, आवडी - निवडी , विनोद, शिकवण, निरीक्षणे, ज्ञान, तत्वज्ञान, संवेदना, यातना, इ. गोष्टी अपेक्षित आहेत पण या साऱ्या गोष्टींचा आवाका खूप प्रचंड आहे आणि मला माझ्या दैनंदिन जीवनासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडी व्यतिरिक्त केवळ या कामासाठी मिळणारा वेळी खूप कमी असेल (कारण खरेय! घरचे कोण फुल्ल परवानगी देणार आहेत याच्यासाठी?) त्यामुळे बघू! वेळ मिळेल त्यानुसार आणि मनात आले त्यानुसार टाकीत जाईल काही काही.
थोडक्यात 'अनंतरंग' हा केलेला एक संवाद असेल मग तो कुठल्याही गोष्टीचा असो! मग तो जगण्याचा असो , हसण्याचा असो , खुलण्याचा असो , खिन्न - विमनस्क होऊन बसण्याचा असो , नात्यांचा असो ,खेळण्या - बागडण्याचा असो , शारीरिक अथवा मानसिक असो , एखाद्या कौशल्याचा असो कि मिळविलेल्या अथवा मिळालेल्या ज्ञानाचा असो! हा संवाद कधी बालिश, पोरकट , असू शकतो तर कधी वयस्क आणि खूप प्रगल्भही असू शकतो . हा संवाद कुठला , कसला , कशाचा , किती प्रमाणात , कुठला स्वरूपात आणि किती वेळ असेल / असू शकेल याची मला स्वतःला पण काही शाश्वती नाही .
(आणखी काही सुचले तर याठिकाणी ऍड करतो नंतर, नाहीतर... )
धन्यवाद!
[Image courtesly:
Photo by Tabitha Mort: https://www.pexels.com/photo/red-tulip-field-607013/]
Comments
Post a Comment
कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.