हारल्या नंतर खरंच सारे जग संपते का ?
एखाद्या मोठया अपयशानंतर जगणे असह्य होते ; पण हारल्या नंतर खरंच सारे जग संपते का ? नाही … , जगावेच लागते , कितीही निराश झाले , कितीही गाऱ्हाणे केले , कितीही रडले - पडले, कितीही कणले - कुतले तरी जीवन जगावेच लागते. … अन जीवन (आपण ) संपविले तर ते संपते का ? नाही … ते परत उभारी घेते कोण्या दुसऱ्या विश्वात , कोण्या दुसऱ्या रुपात! पण चेतना आपलीच असते आणि आपल्यालाच साहावे लागते... तेच जे आपण इथे सोडले होते ते !
मान्य आहे… जिंकणारा नशीबवान असतो . … पण कधी विचार केलाय ? … हारणारा त्याच्यापेक्षाही जास्त नशीबवान असतो ! कारणही तसेच आहे … , जिंकणाऱ्या साठी एक विशिष्ट द्वार खुले असते ; परंतु हरणाऱ्याला हरल्यानंतर आधीच उघडे असलेले जग उपलब्ध असतं . प्रवेश दोघांनाही खुला आहे , फरक मात्र एवढाच आहे कि जिंकणाऱ्या समोरचे प्रवेशद्वार हे दृश्य म्हणजेच दिसणारे असते आणि हरणाऱ्या व्यक्ती समोरचे अनेक प्रवेशद्वार हे अदृश्य म्हणजे न दिसणारे असतात, किंबहुना, खुल्या जगाला कधी प्रवेश द्वार पाहिलेय का ? हि गोष्ट अपयश आलेल्या अथवा हरणाऱ्याला माहीतच नसते , तो आपला निराश , उदास आणि खिन्न होऊनच बसलेला असतो . परंतु असे खिन्न , उदास आणि निराश होणे , कुठलाही फरक न पाहता , कुठल्याही बाबी न तपासता , कुठलेही इतर पर्याय , इतर मार्ग न पाहता कितपत योग्य आहे ?
जिंकणारा नशीबवान असतो कारण त्याला जी संधी पाहिजे असते मिळालेली असते , त्याला ज्या मालकाच्या अथवा ज्या गोष्टीच्या अधिपत्याखाली काम करायचे असते ते भेटलेले असते , त्याला ज्या पद्धतीने काम करायचे असते ती पध्दत मिळालेली असते . परंतु न जिंकणाऱ्या ला काय काहीच भेटत नसते काय ? उलट जिंकणारच जास्त नशीबवान असतो ; कारण त्याच्यासमोर हुकलेली संधी वगळता इतर संध्या प्रचंड उपलब्ध असतात (दुर्दैव फक्त एवढेच आहे कि , हरणारा माणूस फक्त हुकलेल्या संधीकडेच बघत बसतो !) . तो कोणतेही आधिपत्य (मालकी) , कोणतीही विशिष्ट पद्धत (कधी कधी या सार्या बाबी ) नाकारू शकतो आणि स्वतः च्या अधिपत्याखाली , स्वतः च्या पद्धतीने , स्वतः च्या मनाने , कधी कधी अगदी स्वैर , बिनबोभाट कुठल्याही दडपणाशिवाय आणि अगदी स्वतंत्र पणे कार्य करू शकतो .
जिंकणारा यशस्वी असू शकतो , त्याला ज्याच्यासाठी जिंकलाय तेच काम करायचे असते ;परंतु हारणाऱ्या पुढे इतर कामे प्रचंड प्रमाणात पूर्ण करण्यासाठी उभे असतात आणि चौफेर संध्या निवडण्यासाठी उपलब्ध असतात . या सर्वांमध्ये सर्वांत मोठे काम म्हणजे एक चांगला व्यक्ती बनणे आणि एक चांगले व्यक्तिमत्व कमावणे हेसुद्धा असू शकते!
हार जीत आयुष्यामध्ये चालूच असते ! कोण सदा सर्वदा जिंकलाय ? अन कोण सदा सर्वदा हरलाय ? कोणी डाव जिंकतो , कोणी पैसा जिंकतो , कोणी कोणाचे मन जिंकतो तर कोणी विश्वास जिंकतो , कोणी इतरांचे प्रेम जिंकतो , कोणी नुसताच विनर घोषित केल्या जातो आणि बक्षिसाची वाट बघत बसतो . अगदी याचप्रमाणे कोणी परीक्षेचा निकाल हारतो , कोणी भान हरवतो , कोणी शुद्ध हरपतो , कोणी युद्ध हरतो तर कोणी कोणाजवळ आपले हृदयच हरवून बसतं ! … असे हे हरण्याचे प्रकार !
मन हरवण्या सारखा सुखद अपवाद सोडला तर इतर हारण्यामुळे त्रासच अधिक होतो . परीक्षेत नापास झालो - खिन्न ! कुठे नंबर नाही लागला - त्रास ! कुठे नोकरी नाही लागली - परेशानी ! कोणाला प्रेम नाही भेटले - खच्चीकरण , कोणी पैसे नाही दिले - संताप ! … वगैरे वगैरे .
परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही , आपण स्वतः म्हणत असतो कि 'मी हारलो ' म्हणूनच आपण हरलेलो असतो ; म्हणजे आपण स्वतः च स्वीकारलेले असते कि 'मी हरलो ' म्हणूनच उर्वरित मन : स्ताप आपल्या नशिबी येतो . आपण स्वतः च नाही स्वीकारले तर ? आणि आपण स्वतः च स्वतः ला 'हरलो ' असे नाही म्हटले तर ? तर मग आणखी काम , आणखी प्रयत्न , आणखी मेहनत करावीशी वाटेल आणि त्या मेहनतीसाठी जर ईश्वराजवळ काही मागायची पाळी आली तर ? निश्चितच मग कुठलाही व्यक्ती 'फक्त लढण्याचे बळ दे ' असेच मागेन ! असे आहे . जो हरलेला असतो तो काढूनच हरलेला असतो आणि ज्याने हार मानलेली असते, त्याने कुठलीही लढाई वगैरे केलेली नसते . त्याने अगोदरच हार मानलेली असते . दोहोंमध्ये लढाई करून हरलेला 'किमान मी लढलो तरी !' या समाधानाने स्वस्थ असतो . त्यामुळेच …
हारणे आणि हार मानणे , दोहोंमध्ये फरक आहे … एका लढाईचा !
खुल्या जगातील मोकळी हवा (स्वांतत्र्य ) कधी अनुभवलेय ? खुप मज्जा , आनंद आणि समाधान वाटते ! हां खुल्या आणि मोकळ्या जगामध्ये धोकाही तितकाच असतो म्हणा , परंतु आपले अस्तित्व काही एकदमच नष्ट नाही होणार ! काही तरी शिल्लक राहिलच कि ! पुनः हालचाल करायला ! … आणि जरी झालेच , तर कोण आलंय या जगात शाश्वत टिकायला ? धोक्याची पातळी तरी मोजता येईल न ! … अन सोबतच मुक्त स्वातंत्र्याची चव चाखता येईल त्याचे काय ? बंद खोली मध्ये काय आहे ?
रस्त्यावरची ट्रॅफिक बघितलीये कधी ? कशी रांगेमध्येच चाललेली असते , आणि तेही विशिष्ट साईड नेच ! आवश्यकतेनुसार स्पीड कमी जास्त करणारी , मध्ये मध्येच ब्रेक मारणारी ! याच तुलनेत आकाशातील विमाने बघितलीत कधी ? नो ट्रॅफिक , नो रांग . … हा एक विशिष्ट मार्ग असेल कदाचित त्यांचा ; परंतु एकच स्पीड , मर्यादित ब्रेक .
त्याही उप्पर , अंतराळातले रॉकेट बघितलेय कधी ? वन मॅन शो ! एकटाच , (गावाकडच्या भाषेत बोलायचे झाले तर ) कोणाची हाइक नको दईक नको , म्हणजे कोणाचाही डिस्टर्ब नाही , कुठलाही अडथळा नाही , संथ , शांत आणि जसा काही मनमुराद विहार करतोय असा !
त्यामुळे हारल्यानंतरहि (संपूर्ण ) जग (जसे काही केवळ आपल्यासाठीच ) अस्तित्वात असते , नाही ते उपलब्ध असते , गरज असते ती आपली मरगळ झटकण्याची आणि (आलेल्या अपयशा च्या दिशेने केलेली नजर आणि मान ) वळविण्याची आणि पाहण्याची कि , किती (न उचललेल्या , न निवडलेल्या आणि दुर्लक्षित ) संध्या आपल्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत आहेत ते ! गरज आहे ती झोकून देण्याची आणि झेप घेण्याची (अर्थात पंखां निशी ) खुल्या सागर आणि आसमंतात , मुक्त आणि मनसोक्त विहार करण्यासाठी !