मातीमोल


अपयशामध्ये आपली होणारी अवस्था आणि त्यातून आपण कसे वागायला पाहिजे हे सांगणारी मराठी ब्लॉग पोस्ट.
मातीमोल

सोने आणि लोखंड दोहोंसारखे जे-जे काही धातू आहेत ते जमिनीतूनच मिळत असतात, मातीच्या तुलनेत त्यांच्यामध्ये असलेला भरीवपणाही तितकाच असतो आणि कदाचित त्यामुळेच त्यांचे वजनही मातीच्या तुलनेत तेवढेच आणि कितीतरी जास्त असते शिवाय जवळपास सर्वच धातूंना एक विशिष्ट किंमत हि असते. या तुलनेत आपण 'माती' कुठूनही उचलून आणू शकतो तिची किंमत आपल्याला कोणीच मागत नाही. त्यामुळे माती आपल्याला फुकट मिळत असल्यामुळे तिची काही किंमतच नाही असे वाटण्याची शक्यता असते. त्यामुळेच 'मातीमोल' झाले म्हणजे ते धुळीस मिळाले किंवा त्याचे अस्तित्व संपले किंवा त्याची काहीही किंमतच शिल्लक राहिली नाही असा एक समज आपला असतो. आपल्यासोबतचे यशस्वी सोबती पाहता काही अंशी हि गोष्ट खरीही आहे - म्हणजे जेवढा भाव यशस्वी माणसाला मिळत असतो तेवढा भाव अपयशी माणसाला मिळत नाही - म्हणजेच जेवढा भाव धातूंना मिळतो तेवढा भाव मातीला मिळत नाही असेच काहीसे! परंतु याबाबतीत विचार करता - जेव्हा धातू हे अग्निमधून जात असतात तेव्हा ते वितळत असतात आणि त्यांचे पाणी होते आणि जेव्हा माती हि सुद्धा अग्निमधून जात असते तेव्हा मात्र ती वितळत नाही आणि तिचे पाणी होत नाही; याउलट ती अधिक खणखणीत आणि टिकाऊ होत असते आणि नेमका हाच गुणधर्म आपण मातीचा जेव्हा आपण अपयशी किंवा मातीमोल होत असतो तेव्हा गृहीत धरायला पाहिजे! शिवाय (मातीचा) आणखी एक 'निर्मितीचा' आणि जन्म देण्याचा गुणधर्म आहेच कि! म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही मातीमोल व्हाल त्या त्या वेळेस एक नवीन अंकुर तुमच्या मधून फुटू शकतो हेही विसरता काम नये! म्हणजे ज्या ज्या वेळेस आपली अवस्था काहीच किंमत नसल्यासारखी झालेली असेल तेव्हा निराश न होता अशा 'मातीमोल' अवस्थेत काहीतरी आणून पेरायचे आणि ते उगवायची वाट पाहायची आणि त्याच पुढील अंकुरांना खतपाणी घालत घालत स्वतःही मोठे व्हायचे!

मला स्वतःला केव्हा केव्हा अपयशी झाल्यासारखे जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा खूप खेद वाटतो; परंतु पुन्हा दुसऱ्या प्रयत्नाला/कामाला लागावेत लागते! यातूनच मातीमोल झालेल्यांची काय अवस्था होत असेल हा विचार मनामध्ये आला आणि ते किती खचत असतील याची भ्रांत मनामध्ये निर्माण झाली, त्यातूनच वरील दुसरा विचार हि आला आणि तोच शेअर केला.


Comments

  1. खूप छान व प्रेरणादायी लेख

    ReplyDelete

Post a Comment

कृपया, कॉमेंटचे प्रकाशक तुम्ही स्वतः आहात, हे लक्षात घ्यावे.